डॉ. पंडित विद्यासागर ,
कुलगुरू

Dr. P. B. Vidyasagar
Vice-Chancellorस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने 'नॅक' द्वारे 'अ' दर्जा प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कामातील सातत्य, जिद्द, चिकाटी आणि समर्पण यामुळेच हे शक्य झाले आहे. 'अ ' दर्जा मिळाल्यामुळे साहजिकच विद्यापीठाकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे. आमच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा उपयोग शैक्षणिक, प्रशासकीय आणि विस्तार कार्यक्रम राबविण्यासाठी पूर्णपणे करावा लागणार आहे. त्याच बरोबर अध्ययन आणि अध्यापन पद्धतीमध्ये अधिक जोम, उत्साह आणि नाविन्यपूर्ण घटकांची जोड द्यावी लागणार आहे. त्यासाठी निवडीवर आधारित श्रेयांकन पद्धतीचा अवलंब पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पातळीवर होणे आवश्यक आहे. विद्यार्थांचा शिकण्यामधील सहभाग वाढविणे हीच काळाची गरज आहे. अशा प्रकारची वाढ कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आणि कौशल्य विकास हा उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग बनविण्यातूनच शक्य होणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय पातळीवर स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. अशा केंद्राद्वारे 'एक शिक्षक एक कौशल्य ' या सारख्या योजना परिणामकारकरित्या राबविता येतील. घोकंपट्टीवर आधारित अध्ययन पद्धती बदलून सर्वांगीण आणि संकल्पनात्मक शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. अध्ययन आणि अध्यापनाचे स्त्रोत समृद्ध करण्यासाठी योग्य ती पद्धती विकसित करावी लागेल. त्याचबरोबर विद्यार्थांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी विशेष सखोल अभ्यास आणि व्यासंगाची जोपासना करणे आवश्यक आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांचा संशोधनात सहभाग असायलाच हवा. मूलभूत आणि उपयोजित संशोधनातून शिक्षकांनी आपल्या कामाचा ठसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटविणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन शिक्षकांची गुणवत्ता उंचावण्यासाठी येणाऱ्या काळात विद्यापीठांना कठोर निर्णय घेणे भाग पडेल. विद्यापीठांनी अध्ययन आणि अध्यापनाबरोबरच राज्याबाहेरील आणि देशाबाहेरील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी योग्य ती पावले उचलायला हवीत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारने सुचविलेल्या 'स्वच्छ भारत अभियान', 'टीच इन महाराष्ट्रा स्टडी इन महाराष्ट्र' सारख्या योजनांमध्ये योगदान देणे क्रमप्राप्त आहे. समाजातील वंचित घटकांसाठी विशेष कार्यक्रम राबवून त्यांना उच्च शिक्षणात सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुढील काळामध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवर गुणवत्ता सिद्ध करणे हेच आपले ध्येय आहे. मी सर्व संबंधित घटकांना आवाहन करतो की, गुणवत्ता वाढीसाठी त्याचप्रमाणे सामाजिक संवेदना निर्माण करण्यासाठी विद्यापीठाला सहकार्य करावे.

कॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.