Sr.No Name of the course Duration Intake Syllabus 1 Diploma in Digital Marketing 2 Years 30 — 2 Diploma in...
- All Posts
- Dept. Commerce and Management Sciences
Sr.No Name of the course Duration Intake Syllabus 1 M.Com. 2 Years 20 — 2 M.B.A. 2 Years 60 —
Sr.No Name of the course Duration Intake Syllabus 1 B.Com. -Banking and Taxation (AEDP) 4 Years 30 — 2 BBA...
Section Title

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते : श्रीमती चंद्रकला रावळकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आधिसभा सभागृहात युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार क्षेत्रीय निर्देशालय पुणे, माय भारत, नांदेड तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘विकसित भारत युथ पार्लमेंट – 2026’ दिनांक ५ मार्च २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. या युवा संसद वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी होते. यावेळी मंचावर दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहालानी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपाल चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारोती गायकवाड, युवा संसदेचे नोडल अधिकारी डॉ. केशव आलगुले तसेच रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. भागवत पस्तापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या युवा संसदेसाठी विद्यार्थ्यांना “आणिबाणी नंतरचे पन्नास वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी धडा” (50 Years of Emergency: Lessons for Indian Democracy) हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेसाठी माय भारत पोर्टलवर १३१ स्वयंसेवकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३८ स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून इंदिरा गांधी महाविद्यालय, सिडको नांदेड येथील डॉ. भागवत पस्तापुरे, जयक्रांती महाविद्यालय, लातूर येथील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. गीता वाघमारे, शिवनेरी महाविद्यालय, शिरूर अनंतपाळ येथील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. अनिल इंगळे, राजीव गांधी महाविद्यालय, मुदखेड येथील डॉ. दत्तात्रय म्हेत्रे तसेच हुतात्मा गोविंदराव पानसरे महाविद्यालय, अर्धापूर येथील डॉ. नारायण शिवशेट्टे यांनी काम पाहिले. समारोप व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी परीक्षा मूल्यमापन व नियंत्रण मंडळाचे संचालक डॉ. हुशारसिंग साबळे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आपले विचार मांडण्यासाठी युवा संसदेसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी माय भारतच्या प्रतिनिधी व जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंद्रकला रावळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “युवा संसद ही युवकांना लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारी आणि अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणणारी महत्त्वाची संधी आहे. युवकांनी या व्यासपीठावर निर्भीडपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले विचार मांडावेत. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देश पातळीवर लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवकांकडून सकारात्मक कार्य घडू शकते.” तसेच माय भारत पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध स्पर्धा व उपक्रमांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले होते. युवा संसदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात संपन्न “विद्यार्थ्यांनी केवळ पदवीसाठी नव्हे, तर देशसेवेच्या समर्पक भावनेतून संशोधन आणि नवकल्पनांवर भर द्यावा. विज्ञानाच्या बळावरच आपण समर्थ आणि सशक्त भारत घडवू शकतो.” असे प्रतिपादन डॉ. काशीनाथ देवधर यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाच्या वतीने ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “विज्ञान आणि आत्मनिर्भर भारत” या विषयावर आयोजित या विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डीआरडीओ (DRDO) पुणे येथील माजी शास्त्रज्ञ आणि सुप्रसिद्ध ‘गन एक्सपर्ट’ डॉ. काशीनाथ देवधर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. देवधर यांनी भारताच्या संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला. ते म्हणाले की, “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्षेपणास्त्र क्षेत्रात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. पृथ्वी, आकाश, अग्नी मालिका आणि ब्रह्मोस सारख्या क्षेपणास्त्रांमुळे आपली ताकद वाढली आहे. शत्रूची रडार यंत्रणा उद्ध्वस्त करणारे ‘रुद्रम’ आणि प्रगत ‘अग्नी-६’ मुळे भारत आता अधिक सुरक्षित आहे.” डॉ. देवधर यांनी आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. डॉ. कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कारगिल युद्धाच्या काळात काम करण्याची संधी मिळणे, हा आयुष्यातील अमूल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवानांच्या सुविधेसाठी ‘जी बजुका’ गनचे वजन २६ किलोवरून १४ किलोपर्यंत कमी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या हातून घडले, ज्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. संरक्षण सिद्धतेवर आतापर्यंत १०३१ हून अधिक व्याख्याने देऊन त्यांनी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली आहे. या प्रसंगी व्यासपीठावर विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. शैलेश वाढेर, रसायनशास्त्र संकुल संचालक डॉ. संगीता माकोने, समन्वयक डॉ. अविनाश पुयड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. ज्ञानेश्वर वानखेडे, डॉ. चैतन्या, डॉ. सुहास पाठक, डॉ. गट्टानी, डॉ. पेकमवार, डॉ. यशवंत जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. संगीता माकोने यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे डॉ. काशीनाथ देवधर यांचा विद्यापीठाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

स्वारातीम विद्यापीठात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा शुभारंभ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या वतीने विद्यापीठ परिसर तसेच उपपरिसरांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दि. ५ मार्च ते १८ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्यात वृद्धी करून त्यांना बाजारपेठेतील गरजांनुसार तयार करणे. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्व विकास यावर विशेष भर दिल्या जात आहे. केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर संवाद कौशल्य आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यावर विशेष भर. विद्यापीठ मुख्य परिसरातील सर्व संकुल तसेच उपपरिसरातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांचा यात सहभाग. “विद्यापीठातील विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता, त्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात लागणारी कौशल्ये आत्मसात करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक प्रगतीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.” अशी माहिती कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. सुरेंद्र जी. गट्टानी यांनी यावेळी दिली. विद्यापीठाच्या या कौशल्याधिष्ठित शिक्षण उपक्रमाला विविध संकुलांतील विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भविष्यातील स्पर्धात्मक युगासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च, २०२६ उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि प्राध्यापकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा दि.१६ मार्च, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठ आणि इन्फ्लिबनेट सेंटर, गांधीनगर (गुजरात) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. “युजर अवेअरनेस प्रोग्राम ऑन आयरिन्स अँड इन्फ्लिबनेट सर्व्हिसेस फॉर स्कॉलरली कम्युनिटीज” या विषयावर आधारित या कार्यशाळेत संशोधकांना जागतिक स्तरावरील संशोधन साधनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. ‘आयरिन्स’ (IRINS) हे भारतीय संशोधकांच्या शोधनिबंध व शैक्षणिक कार्याची नोंद ठेवणारे विनामूल्य वेब-पोर्टल असून, या माध्यमातून संशोधकांना त्यांच्या कार्याला जागतिक ओळख मिळवून देणे आणि शैक्षणिक नेटवर्क विस्तारण्यास मदत होते. कार्यशाळेत इन्फ्लिबनेट केंद्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ ‘आयरिन्स’, वन नेशन वन सबस्क्रिप्शन, विद्वान व शेर्नी पोर्टल, शोध-चक्र तसेच ऑर्किड या डिजिटल प्लॅटफॉर्मची माहिती देणार आहेत. ही कार्यशाळा सर्व विद्याशाखांतील सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, नॅक-आयक्युएसी समन्वयक, ग्रंथपाल आणि सक्रिय संशोधकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केवळ १०० ते १२० सहभागींची निवड करण्यात येणार असून, कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च, २०२६ आहे. नोंदणी करताना प्राचार्य, विभागप्रमुख किंवा संशोधन मार्गदर्शक यांचे अधिकृत शिफारसपत्र जोडणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार तसेच इन्फ्लिबनेटच्या संचालिका प्रो. देविका पी. मदल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. ज्ञान स्रोत केंद्राचे प्र. संचालक डॉ. जगदीश नरहरराव कुळकर्णी हे कार्यक्रमाचे समन्वयक आहेत. इच्छुकांनी https://irins.org/irins-outreach या लिंकवर नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ज्ञान स्रोत केंद्राचे प्र. संचालक किंवा डॉ. अरुण हंबर्डे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.