जैवशास्त्रातील नविनता व उपयोग (IALS–2026) विषयावर स्वारातीम विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

जैवशास्त्रातील नविनता व उपयोग (IALS–2026) विषयावर स्वारातीम विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद वाहकजन्य रोग व प्रतिजैविक प्रतिकारावर होणार सखोल चर्चा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील जैवशास्त्र संकुलाच्या वतीने “जैवशास्त्रातील नविनता आणि उपयोग (IALS–2026)” या विषयावर दि.२६ व २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या जागतिक स्तरावरील महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या वाहकजन्य रोग (VBD) व प्रतिजैविक प्रतिकार (AMR) याविषयांवर या परिषदेत सखोल विचारमंथन होणार असल्याची माहिती संयोजक तथा संकुलाचे संचालक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी दिली. या परिषदेत वाहकजन्य रोग, प्रतिजैविक प्रतिकार, “वन हेल्थ” व एकात्मिक दृष्टीकोन, कृत्रिम बुद्धिमत्ता व रोगवाहक, प्रवाह सर्वेक्षण तसेच आण्विक निदानातील नविनता या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात येत आहे. जैवशास्त्र संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी देश-विदेशातील नामवंत शास्त्रज्ञ व तज्ज्ञ उपस्थित राहणार असून त्यामध्ये सेनेगल, थायलंड, सिंगापूर, अमेरिका आदी देशांतील तज्ज्ञांचा सहभाग आहे. काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष तर काहींचे दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. परिषदेत सर्वोत्तम तोंडी सादरीकरण व सर्वोत्तम पोस्टर सादरीकरणासाठी प्रत्येकी तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वीतेसाठी कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे यांच्यासह जैवशास्त्र संकुलातील प्राध्यापक, कर्मचारी व संशोधक विद्यार्थी परिश्रम घेत असून विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठ परिसरातील संलग्न महाविद्यालयांतील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले आहे.