स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा

स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनानिमित्त व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भाषा संकुलाचे संचालक प्रा. दिलीप चव्हाण, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. शैलजा वाडीकर, मराठी विभागाचे प्रा. वैजनाथ अनमुलवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिन साजरे करण्यापाठीमागची भूमिका व मराठीचे महत्त्व याविषयी प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी सविस्तर मांडणी केली. तसेच कुसुमाग्रजांच्या ‘गाभारा’ या बहुचर्चित कवितेचे वाचन केले. प्रा. शैलजा वाडीकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यावर प्रकाश टाकला व मराठीचे वैभव याविषयी भाष्य केले. आणि ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ या कवितेचे वाचन केले. दिलीप गरड, डिगांबर सत्वधर, बसवंता भोरगे, सूरज मोगले या संकुलातील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यनिर्मितीवर व कवितावाचन केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. दिलीप चव्हाण यांनी मराठीचा प्रवास आणि सद्यस्थिती यावर भाष्य केले आणि मनोहर वाकोडे यांची कविता सादर केली. याप्रसंगी, साहित्य अकादेमीने तयार केलेली अरुण कोलटकर या कवीच्या जीवनावरील माहितीपट दाखविण्यात आला. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या वृद्धीसाठी हे संकुल नेहमीच कार्यक्रम आयोजित करत असते. मराठी भाषा ही ज्ञान भाषा झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मराठीचा वापर केला पाहिजे. नव्या पिढीला मराठी भाषा व साहित्याचे महत्त्व कळाले पाहिजे. हा दृष्टिकोन समोर ठेवून संकुलातील शिक्षक प्रयत्न करत असतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकुलातील विद्यार्थी, कर्मचारी यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी संकुलातील पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.