
स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी चेन्नईला रवाना भारतीय विद्यापीठ महासंघ (AIU) यांच्या वतीने आयोजित ३९ व्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवक महोत्सवात (UNIFEST) सहभागी होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ चेन्नईकडे रवाना झाला आहे. हा महोत्सव १० ते १४ मार्च, २०२६ दरम्यान तमिळनाडूतील चेन्नई येथील सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे होणार आहे. या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय महोत्सवात विद्यापीठाचा संघ सहा विविध कलाप्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करणार आहे. यात शास्त्रीय सूरवाद्य, फोक आर्केस्ट्रा, आदिवासी दंडार नृत्य, संकल्पना नृत्य, प्रहसन (Skit) आणि मूकअभिनय (Mime) या स्पर्धांचा समावेश आहे. या माध्यमातून मराठवाड्याची कला राष्ट्रीय स्तरावर सादर होणार आहे. संघ रवाना होण्यापूर्वी विद्यापीठ संकुलात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, प्र.कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. हुशारसिंह साबळे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, ‘रासेयो’ संचालक डॉ. मारोती गायकवाड आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी संघाला शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. विद्यार्थी विकास विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाने संघासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून, राष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा झेंडा फडकवण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. या संघात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह अनुभवी मार्गदर्शक व प्रशिक्षकांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक डॉ. संदीप काळे काम पाहत आहेत. त्यांच्या सोबत डॉ. शिवराज शिंदे, दिलीप डोंबे, सिद्धार्थ नागठाणकर, संदेश हटकर, संकेत गाडेकर तसेच वाद्यवृंद साथीदार चेन्नईकडे रवाना झाले आहेत.